मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

वडिलांची धाकटी बहीण आणि वडिलांची मोठी बहीण

डाउनलोड वडिलांची धाकटी बहीण आणि वडिलांची मोठी बहीण

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

‘वडिलांची लहान बहिण आणि वडिलांची मोठी बहिण’ या संकल्पनेकरता आत्या हा शब्द महाराष्ट्रातील बहुतांश भौगोलिक प्रदेशात वापरला जातो.

धोंगडे (२०१३:७५) मध्ये सदर नातेवाचक शब्दासाठी आत्या, आक्का, मावळण व फुई या शब्दांची नोंद केलेली आहे. त्यात त्यांनी मावळण या शब्दाचा वापर कमी असून आक्का हा शब्द मर्यादित केंद्रात माहिती असल्याचे नमूद केले आहे.

सदर सर्वेक्षणात आत्या या शब्दाचे ध्वन्यात्मक परिवर्तन होऊन महाराष्ट्रातील विविध भागांत आत्ती, आत, आत्तं अत्या, आत्त्या, आत्ये, आतेय, आत्ते, अत्ती, आत्तो, आतो, आतव, आतू, आतूस, इ. शब्द दिसुनआले.. तसेच आत्याबाई किंवा आत्त्याबाय हा आदरदर्शक शब्ददेखील कमी-अधिक प्रमाणात मिळतो. आत हा शब्द बीड, नांदेड,उस्मानाबाद या जिल्ह्यांमधील विविध समाजात तुरळक प्रमाणात आढळला आहे.

आत्या या शब्दासोबतच आत्ती हा शब्द कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत प्रामुख्याने आढळून आला आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातही हा शब्द तुरळक प्रमाणात आढळून आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्ते हा शब्दही मोठ्या प्रमाणात सापडतो.

मावळण हा शब्द सातारा, सोलापूर, रायगड, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, ठाणे, जालना, पुणे आणि बीड या जिल्ह्यांतील ठराविक गावांमध्ये आढळून आला आहे.

फुई हा मुळचा गुजराती शब्द असून या शब्दातही फुय, फुया, फुयो, फुई, फफू, फुईस, फुई ध्वनीस्तरावरील भेद आढळून आले आहेत. हा शब्द गुजरात राज्य व हिंदी भाषिक प्रदेशाला लागून असलेल्या भौगोलिक प्रदेशात प्रामुख्याने आढळून येतो. फुई, फुईस हे शब्द रायगड आणि पुणे जिल्ह्यातील कातकरी समाजात मिळाले आहेत. त्याचबरोबर पालघर आणि ठाणे जिल्हयातील वारली, ठाकूर, कातकरी, कोकणा, दुबळा आणि कुणबी या समाजातदेखील फुई, फुया, फुईस या शब्दांचा वापर आढळून येतो. बीड जिल्ह्यातील वंजारी समाजातदेखील फुई शब्द वापरलेला दिसतो. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव आणि वैजापूर तलुक्यातील भिल्ल, मुस्लिम तसेच बौद्ध, राजपूत (भामटा) या समाजातही फुई हा शब्द वापरलेला दिसतो. जळगाव, धुळे, .नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यातील अहिराणी भाषकांमध्ये फुई या शब्दाचा वापर प्रामुख्याने दिसून येतो. तसेच बुवा व फुफू हे मूळचे राजस्थानी वळणाचे शब्द असून त्यात बुआ, फूआ आणि फफू, फुवा, फपी, फुपू, फुपे फुफू, फुस, फुपी, फाफू, फोफू हे ध्वनिभेद आढळून आले आहेत. फुफू हा शब्द प्रामुख्याने मुस्लिम समाजात आढळून आला आहे. त्याचप्रमाणे नंदेड येथील बंजारा समाजात फुफी हा शब्द वापरलेला दिसतो. फुफू हा शब्द चांभार, करार, मरार या समाजातही आढळून आला आहे. आक्का हा शब्द रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि राजापूर तालुका, सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील चाळकेवाडी गाव आणि नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुका अशा निवडक ठिकाणी आढळून आला आहे. आवा हा शब्द कोल्हापूरातील चंदगडमधील ग्रामीण भागात आढळला आहे.